प्रलंबित प्रश्नांवरून पालिकेच्या कीटकनाशक विभागातील कामगार आक्रमक; आंदोलनाचा पवित्रा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत कार्यरत असलेल्या कीटकनाशक विभागातील कामगारांचे विविध प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून प्रशासनाकडून सातत्याने होणाऱ्या चालढकलीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. महापालिकेच्या ‘ए’ ते ‘टी’ विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप म्युनिसिपल मजदूर युनियनने केला असून, आपल्या मागण्या मान्य न झाल्यास थेट आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.

​याबाबत प्रशासनाला जाब विचारण्यासाठी सर्व कामगार आणि कर्मचारी ३० सप्टेंबर रोजी कीटकनाशक अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहेत. या बैठकीत प्रशासनाकडून सकारात्मक तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा अंतिम निर्णय कामगारांनी घेतला आहे. कीटकनाशक विभागातील विविध चौक्यांची झालेली दुरवस्था आणि त्याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दाखवली जाणारी अनास्था यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

​त्याचप्रमाणे कंत्राटदारांमार्फत कामगारांना कामाच्या ठिकाणी सोडल्यानंतर परत चौकीवर आणण्यासाठी वाहने दिली जात नाहीत, तसेच सध्या कार्यरत असलेल्या वाहनांचीही प्रचंड दुरावस्था झाली असल्याचे युनियनने अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, कामगारांना लॉकर उपलब्ध करून देण्याचा निर्णय होऊनही अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे मूलभूत सुविधा, वाहनांची उपलब्धता आणि तातडीने लॉकर उपलब्ध करून देण्याच्या मुद्द्यांवर पालिका प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »